Tuesday, 12 January 2016

गोकर्ण-अचानक भयानक – 2


२४.१२.२०१५

दुपारचे अडीच वाजले असतील मी गोकर्णला पोहोचले तेंव्हा. प्रचंड उकडत होतं तिथं. प्रवासही भरपूर झाला होता माझा. भूक लागली होती. किरील ला यायला अजून एक तास होता. तो येईपर्यंत मी जेवण करायचं ठरवलं. बस stop जवळच “राघवेंद्र” म्हणून एक छोटंसं restaurant होतं. मी आत जाऊन बसले. आत, local कन्नड लोकांबरोबरच काही विदेशी पर्यटकही जेवण करत होते. कर्नाटक मध्ये असल्यामुळे जास्त विचार न करता “मसाला डोसा” आणि चहा order केला.  बिल आलं ३० रुपये फक्त.

Restaurant पूर्ण भरलेलं होतं. माझ्या टेबल वर पंजाबी सूट घातलेली साठीतली एक विदेशी महिला येऊन बसली. उंचीला जास्तीत जास्त ५ फुट असेल. तिने चांदीचे दागिने घातलेले होते अंगावर. मला का कुणास ठाऊक पण छान वाटलं तिच्याकडं पाहून. मी तिला complement दिली कि नाकात घातलेली, रिंग छान दिसतेय. खरच छान दिसत होती तिला. तिने दही आणि बटाट्याची भाजी order केली.

थोड्याच वेळात ती माझ्याशी बोलायला लागली. तिला आधी वाटलं कि मी पण विदेशी पर्यटक आहे. माझा अवतार पाहून तिला असं वाटलच कसं असेल देव जाणे. मी तीचा गैरसमज दूर केला, तीला सांगितलं कि मी भारतीय आहे, पुण्याहून आलेय. आणि जेंव्हा तिला समजलं कि मी २९ वर्षांची, unmarried आणि solo traveler आहे, तिला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि एकदम भारतीय म्हातारीने टोमणा मारावा असे expressions देत मला बोल्ली, “काय ?, एवढी मोठी झालीस, लग्न नाही केलंस अजून, आणि एकटीच फिरतेस...” तिचा तो spontaneous performance पाहून मला हसू आवरेना.

आणि मग मला समजलं, कि तिला मी भारतीय का वाटले नाही, कारण भारतीय मुली एकट्या travelling करतच नाहीत, असा समज म्हणा, गैरसमज म्हणा बाहेरच्या लोकांमध्ये आहे. किंबहुना तिचा गैरसमज इतका पक्का होता कि मी दिसायला १००% भारतीय असूनही, तीला मी विदेशी वाटले. 

आम्ही खूप हसलो आणि मग गप्पाच गप्पा सुरु झाल्या. माझ्याबद्दल सगळी विचारपूस केली तिने. मी तिला विचारलं , तू एकटीच आलीयेस गोकर्ण फिरायला? का कुणास ठाऊक पण तिने तिची सगळी story च सांगायला सुरुवात केली.

ती सांगू लागली, वयाच्या २७ व्या वर्षापर्यंत तिचा अख्खा पूर्ण युरोप फिरून झाला होता. युरोप फिरता फिरता तिला जॉन भेटला. त्यालाही भटकायची खूप आवड होती. दोघांची मस्त गट्टी जमली. प्रेमात पडले. आणि केरिन वयाच्या २७ व्या वर्षी pregnant राहिली. आणि अजून ती जॉनला व्यवस्थित ओळखत पण नव्हती. तीन महिन्यांची तर त्यांची ओळख. ती पण प्रवासातली. तिच्या आईच्या मते तिने जॉन च्या बाळाला जन्म नको होता द्यायला. केरिनने पण आधी तोच विचार केलेला. जॉन विवाहित होता आणि त्याचा पहिल्या लग्नात  काहीतरी problems होते आणि त्याची घटस्पोट घ्यायची process सुरु होती. पण तो अजूनही विवाहीतच होता. त्यामुळे केरिनला काय करावा समजत नव्हतं.

एकदा असंच तिच्या डोक्यात विचार आला, कि सगळे precautionary measures वापरत असूनही ती pregnant राहिली म्हणजे, हे देवाच्या मनात होतं. म्हणजे हे होणारच होता, हेच योग्य आहे. तिने बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. आणि जॉनवर काही एक बंधन न टाकता किंवा जबाबदारी न देता त्याला त्याचा निर्णय घ्यायला सांगितलं. जॉनला त्याचा आधीच्या लग्नाला दुसरा chance द्यायचा होता. तो केरिनला सोडून त्याच्या बायकोकडे गेला. केरिनने पण त्याला अडवलं नाही. त्या दिवशी तिने बोल्लेलं एक वाक्य माझ्या जसाच्या तसं लक्षात आहे, “you cant make a man to stay, dear.” तुम्ही जाणाऱ्या माणसाला थांबवू शकत नाही. थांबवायलाही नको.

केरिन कॅलिफोर्नियाला आली. परत job सुरु केला. काही महिन्यांनी जॉन परत तिच्याकडे आला. त्याला घटस्पोट झाला होता एव्हाना. केरिनने तिच्या मोठ्या मुलाला जन्म दिला. तिने त्याचं नाव सेथ ठेवलं. हिब्रू भाषतला नाव आहे हे, तिने सांगितलं.  

सेथ एक वर्षाचा असताना जॉनने camper van घेतली आणि ते तिघं जण पूर्ण south अमेरिका फिरले. मी तिला मध्ये थांबवून विचारलंच, एक वर्षाच्या लेकराला घेऊन तुम्ही फिरले? ती “हो” बोल्ली फ़क़्त. आणि प्रवासातल्या गमतीजमती सांगायला लागली. काही दिवसांनी त्या दोघांनी विचार केला कि सेथला एखादा भाऊ किंवा बहिण हवा. सेथ दोन वर्षाचा असताना केरिनणे तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. इथन नाव त्याचं.

केरिन आणि जॉनचं त्यांच्या दोन मुलांबरोबर बरोबर आयुष्य मजेत चाललं होतं. एक दिवस अचानक जॉन केरीनला बोल्ला कि आपण लग्न करूयात. तिने पहिल्यांदा स्पष्ट नकार दिला. तिला जे चाललंय ते मजेत आणि योग्य चाललंय असं वाटत होतं. ती खूप होती जॉन आणि दोन मुलांबरोबर. लग्न करायची तिला गरज वाटत नव्हती. पण मग जॉनने तिला सांगितलं कि, त्याच्या घरात तो एकटाच मुलगा आहे आणि त्याचं नाव पुढे चालवायसाठी त्याला त्याच्या मुलांना त्याचं नाव द्यायचं होतं. मग तर केरिन काही केल्या लग्नाला तयार होईना. केरिन बोल्ली, जास्त दिवस मला त्याला नाही म्हणता आलं नाही, “I was in love with him”. थोड्या दिवसात आम्ही लग्न केलं.  लग्नाला तिचे दोन मुलं आणि ४ common friends आणि ते दोघं. दोघांच्याही घरचे, आई वडील सुद्धा busy असल्यामुळे येऊ शकले नाहीत. घरातल्या घरातच लग्न झालं.

केरिन चा संसार निवांत चालला होता. १३ वर्ष झाली लग्नाला. मुलं मोठी झाली होती. शाळेत जात होती. job पण तिच्या मनासारखा होता. आणि जॉनच्या आयुष्यात अजून एक दुसरी केरिन आली. आपल्या केरिनने परत तोच पावित्रा होता, “you cant make a man to stay, dear.”

त्या दोघांनी divorce घ्यायचा ठरवला. ती मला सांगत होती, आम्ही एक कागद घेतला, त्यावर पेनने एक उभी रेषा आखली. एका बाजूला केरीनला हव्या असणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला जॉनला हव्या असणाऱ्या गोष्टी. अगदी न भांडता, तमाशा न करता दोघं वेगळे झाले. मुलांची custody २ आठवडे केरिन, २ आठवडे जॉन कडे अशी होती. दोघं एकाच शहरात राहत असल्यामुळे मुलांच्या शाळेचा वगेरे काही जास्त त्रास नाही झाला.

केरिनचा प्रवास सुरूच होता मुलांना घेऊन. जॉन नंतर तिच्या आयुष्यात २-३ boyfriends आले. ते हि चांगले होते. प्रवासाची आवड असणारे होते. तिला लग्नाची मागणी पण घातलेली एक दोघांनी, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती, तिचं उत्तर असं असायचं, मी हे सगळं करून चुकलेय. लग्न केलंय, दोन मुलं आहेत मला. मला त्यांना सांभाळायचय. मला परत या चक्रात अडकायचं नाहीये.

हे सगळं सुरु असताना जॉनबरोबरची मैत्री तिने कधी तोडली नाही. त्यामुळे पालकांच्या divorce मुळे इतर मुलांना जो त्रास सहन करावा लागतो तो केरिनच्या मुलांना सहन करावा लागला नाही. दुसऱ्या केरिन बद्दल तिचं मत अगदी स्पष्ट होतं, “तीला मी माझी मैत्रीण वगेरे म्हणणार नाही, याचा अर्थ ती वाईट आहे असं नाही. ती चांगली व्यक्ती आहे. जेंव्हा जेंव्हा माझी मुलं जॉन कडे राहायची, तेंव्हा माझ्या मुलांची spet mother म्हणून खूप चांगली वागलीये ती. आम्ही facebook friends  आहोत आणि अधून मधून एकमेकींच्या photos ला like करत असतो.” हसून सांगत होती ती.

आता तिचा सेथ ३६ वर्षांचा आणि इथन ३४ वर्षांचा आहे. २ वर्षांपूर्वी सेथने लग्न केलंय. लग्नाच्या आधी त्याने केरिनला call करून सांगितलं कि तो लग्न करत आहे. केरिन तेंव्हा चीन मध्ये  होती. लग्नाला ती जाऊ शकली नाही. तिला आता आठ महिन्यांची एक नात पण आहे, तिचा नाव Sky आहे. इथन त्याच्या girlfriend बरोबर अलास्काला सहा महिने आणि कॅलिफोर्नियाला सहा महिने असं राहतो. तो photographer आहे. मागच्या वर्षी त्याला आईची खूप आठवण आलेली तर, girlfriend घेऊन २ महिन्यांसाठी तिला भेटायला आलेला, केरिन तेंव्हा भारतातच होती. तिने सांगितलं कि त्या दोघांना जैसलमेर मधली camel सफारी आणि गोव्याचे beaches भलते आवडले. जॉन आणि दुसरी केरिन पण अमेरिकेतल्या कुठल्या तरी शहरात राहतात.

मध्यंतरी तिच्या भाचीच्या लग्नात हे सगळे लोकं भेटले. तेंव्हा केरिनने Sky ला पहिल्यांदा पाहिलं. Sky बद्दल बोलताना ती आपल्याकडच्या आज्जीसारखीच वाटायची.

ती सांगत होती, सगळे busy आहेत. आम्ही वारंवार भेटत पण नाही. पण सगळ्यांमध्ये emotional bond आहे. आठवण आली कि skype वर बोलणं होतं मग.


तिची story ऐकता ऐकता २ तास कधी निघून गेले समजलंच नाही. किरील पण पोहोचला होता बस stop पर्यंत. उशीर झालेला त्याला पोहोचायला. केरिन मला सोडवायला आली तिथपर्यंत. मला स्व:ताची काळजी घ्यायला सांगितली.  आणि गडबडीत तिचा contact number न घेताच मी किरील बरोबर निघून गेले.  

2 comments: